Loan waiver update : सध्या राज्यात सुरू असलेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक पिके चिखलात पडून असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची (Loan waiver) मागणी अधिक तीव्र होऊ लागली आहे. पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने मदत करा आणि कर्जमाफीचा निर्णय घ्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून हालचाली सुरू
हिवाळी अधिवेशनात सरकारकडून कर्जमाफीची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यभरातील थकबाकीची माहिती मागवण्यात आली असून ऑक्टोबरअखेर अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार शेतकऱ्यांकडे तब्बल 35,477 कोटी रुपयांची बँक थकबाकी आहे. यात सोलापूर जिल्हा सर्वाधिक थकबाकीदार असून जवळपास पावणेतीन लाख शेतकऱ्यांकडे 3,976 कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. जर अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार, सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर तब्बल 35 हजार 477 कोटी रुपये एवढी बँक थकबाकी आहे. थकबाकी न भरल्यामुळे जवळपास 24 लाख 73 हजार शेतकऱ्यांचे बँक कर्जासाठीचे (Bank Loan) दरवाजे बंद झाले आहेत. दरम्यान, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे 69 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची सविस्तर माहिती मागवली असून, हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? येथे पहा खरी आकडेवारी..!
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, सोलापूर, अमरावती, बीड, यवतमाळ, नांदेड, परभणी आणि पुणे या दहा जिल्ह्यांतील एक ते दोन लाख शेतकऱ्यांवर बँक कर्जाची थकबाकी आहे. याशिवाय, दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर खासगी सावकारांचे तब्बल दीड ते दोन हजार कोटी रुपयांचे कर्जाचे ओझे आहे. एका बाजूला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पिकांचे नुकसान आणि दुसऱ्या बाजूला बँकांकडून येणाऱ्या वसुलीच्या नोटिसा, यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. या आर्थिक आणि मानसिक तणावातून दररोज सरासरी सहा शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे.
येथे वाचा – सोयाबीन भाव वाढणार; या कारणामुळे शेतकऱ्यांना भाव मिळण्याची शक्यता..!