MHADA Lottery 2025 : मुंबईत म्हाडा लॉटरी ही सर्वसामान्यांसाठी घर मिळवण्याची मोठी संधी मानली जाते, म्हणूनच तिचं महत्व अधिक आहे. आता या लॉटरीची यादी जाहीर झाली असून अनेकांच्या नजरा त्यावर खिळल्या आहेत. आता सोडत कधी होणार आणि कोणत्या भाग्यवानांना घराची संधी मिळणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण इथे केला आहे..
मुंबईत म्हाडाच्या तब्बल 5 हजार 285 घरांसोबतच 77 भूखंडांची सोडत 11 ऑक्टोबरला होणार असून, त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुधवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीनुसार, अनामत रकमेसह आलेल्या 1 लाख 58 हजार 424 अर्जांपैकी 1 लाख 57 हजार 207 अर्ज पात्र ठरले आहेत, तर 1217 अर्ज अपात्र ठरले असून या अपात्र ठरलेल्यांना शुक्रवारपर्यंत दावे-हरकती नोंदवण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, पात्र अर्जांपैकी तब्बल 90 टक्के म्हणजेच 1 लाख 45 हजार 805 अर्जदार केवळ 565 घरांसाठी स्पर्धेमध्ये आहेत आणि ही घरे 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील आहेत.
कोकण मंडळाने जुलै महिन्यापासून सोडतपूर्व प्रक्रिया सुरू केली होती. या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 565 घरे, एकात्मिक योजनेतील 3002 एवढी घरे, म्हाडा योजनेतील 1677 घरे, इतर योजनेतील 41 घरे तसेच यात 77 भूखंडांचा समावेश होता. मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीची तारीख दोनदा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी सोडत घेण्यात येणार असल्याची घोषणा मंडळाकडून करण्यात आली. त्याआधी 22 सप्टेंबर रोजी अर्जांची प्रारूप यादी जाहीर करायची ठरवण्यात आले होते. पण ही तारीख पुढे ढकलून 30 सप्टेंबर करण्यात आली. तरीदेखील अर्जांची छाननी वेळेत पूर्ण न झाल्याने 30 सप्टेंबर रोजीही यादी जाहीर करता आली नाही. त्यामुळे अर्जदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती.
येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त कनेक्टिव्हिटी व सुविधा..
अर्जदारांमध्ये वाढलेल्या नाराजीचा विचार करून छाननीची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1 ऑक्टोबरच्या सायंकाळी यादी जाहीर करण्याचे ठरले. पण ही यादी वेळेत प्रसिद्ध न झाल्याने कोकण मंडळाला सोडतीची तारीख 9 ऑक्टोबरवरून 11 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलावी लागली. अखेर 11 ऑक्टोबरला सोडत घेण्याचे निश्चित झाले असून, या सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी बुधवारी रात्री प्रसिद्ध केली आहे. यावेळी एकूण 5 हजार 285 घरे आणि 77 भूखंडांसाठी 1 लाख 58 हजार 424 एवढे अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाल्याची नोंद आहे.
पात्र अर्जाची अंतिम यादी या दिवशी येणार
प्रारूप यादीनुसार आलेल्या अर्जांपैकी 1217 अर्ज अपात्र ठरले, तर 1 लाख 57 हजार 207 एवढे अर्ज पात्र म्हणून घोषित झाले आहेत. त्यामुळे आता पात्र अर्जदार सोडतीमध्ये सहभाग घेणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, अपात्र ठरलेल्या 1217 अर्जदारांना दावे–हरकती दाखल करण्यासाठी शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या दावे–हरकतींचा विचार करून 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरच सोडतीत प्रत्यक्ष किती अर्जदार सहभागी होतील हे स्पष्ट होईल. अखेर, 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोडतीत कोणाचे नशिब उजळणार, हे समजणार आहे.
येथे वाचा – आता म्हाडाचा नियम बदलणार, तुमचा फायदा होणार?