MHADA Flats Mumbai : दिवाळीच्या तोंडावर म्हाडाकडून घर घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मंडळाची पाच हजार घरांची सोडत जाहीर करण्याची योजना होती, मात्र पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने ती थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. पण निराश होण्याचं कारण नाही. कारण दिवाळीत म्हाडाची खास घरविक्री मोहीम येत आहे. ज्यात 200 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हाडाचे घर (Mhada Flats) घेण्याची ही मोठी संधी आहे. मुंबई मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर थेट विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यासाठी तयारी जोमात सुरू आहे. यामध्ये ताडदेवमधील तब्बल सात कोटींची उच्च उत्पन्न गटातील घरे, तसेच तुंगा-पवई आणि इतर परिसरातील विक्रीसाठी उपलब्ध घरे सामील असणार आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे मिळावीत म्हणून म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांतून नियमितपणे सोडती काढल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून कोकण, पुणे आणि इतर मंडळांतील अनेक प्रकल्पांमध्ये घरांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी ही घरे विक्रीवाचून रिकामीच राहिली आहेत. अशा परिस्थितीत, दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत घेऊनही घरे न विकली गेल्यास ती ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर देण्याची तरतूद म्हाडाच्या धोरणात करण्यात आली आहे. त्यानुसार आता म्हाडाने रिक्त घरांच्या विक्रीला गती दिली असून, कोकण आणि पुणे मंडळांतील हजारो घरे या तत्वावर विक्रीसाठी खुली करण्यात आली आहेत.
मुंबई मंडळातील विक्रीवाचून रिक्त राहिलेल्या घरांचे वितरण आता ‘प्रथम प्राधान्य’ या तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, येत्या दिवाळीपूर्वी या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येथे वाचा – मुंबईत दिवाळीपूर्वी घरांची लॉटरी; प्राईम लोकेशनवर घरे, पहा घरांच्या किमती..!
म्हाडाच्या निर्देशानंतर मुंबई मंडळाच्या पणन विभागाने दोन किंवा त्याहून अधिक वेळा सोडत काढूनही विकली न गेलेली घरे शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. या घरांची यादी तयार करून लवकरच त्यांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वानुसार पात्र अर्जदारांना ही घरे थेट दिली जाणार आहेत. त्यामुळे या दिवाळीत मुंबईकरांना स्वतःचं घर मिळवण्याची नवी सुवर्णसंधी मिळणार आहे.
2023 मध्ये झालेल्या म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील तब्बल साडेसात कोटींची सात आलिशान घरे उपलब्ध होती. पण आश्चर्य म्हणजे उच्च उत्पन्न गटातील या घरांना एकही खरेदीदार मिळाला नाही. किंमत कमी करून ती सात कोटींवर आणल्यानंतरही प्रतिसाद शून्यच राहिला. इतकंच नव्हे, तर पवई आणि तुंगामधील काही फ्लॅट्सही अजून विकले गेलेले नाहीत. आता म्हाडा या सर्व घरांची, म्हणजे ताडदेव, पवईसह जवळपास 200 फ्लॅट्सची ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्रीसाठी दिवाळीत नवी जाहिरात काढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना या सणात घर मिळवण्याची नवी संधी खुली होणार आहे.
येथे वाचा – म्हाडाची नवीन योजना; कोणीही घ्या घर, पहा कशी आहे नवी योजना?
तब्बल 19 वर्षांनंतर मुंबईत ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर घरविक्री
कोकण, पुणे आणि इतर म्हाडा मंडळांमध्ये घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर नेहमीच होत असते, मात्र मुंबईत ही प्रक्रिया जवळपास दोन दशकांपासून थांबली होती. मुंबईत 2006 पूर्वी अशा पद्धतीने घरे विकली जात होती, पण 2007 पासून सोडतीच्या माध्यमातूनच घरवाटप सुरू झाले. मुंबईतील म्हाडा प्रकल्पांना नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळाला. काही हजार घरांसाठी लाखो अर्जदारांनी नाव नोंदवले. आजही तसाच उत्साह कायम आहे. मात्र, उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या वाढत्या किंमतीमुळे काही प्रीमियम फ्लॅट्स विक्रीविना राहिले आहेत. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर, मुंबई मंडळात पुन्हा एकदा ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर घरविक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यातून अनेकांना घर मिळवण्याची सुवर्णसंधी मिळू शकते.
येथे वाचा – म्हाडाचं 90 लाखाचं घर 28 लाखात कसं मिळेल? असा करा अर्ज..!