Wet drought in Maharashtra : अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. अनेक शेतात पाणी साचले असून काहींचे तर संपूर्ण पीक वाहून गेले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी घरे पाण्याखाली गेली, तर काही गावांत घरं देखील कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने भरीव मदत मिळावी, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. विरोधकांनी तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणीही पुढे केली आहे. दरम्यान, सरकारकडून शेतकऱ्यांना किती मदत केली जाणार याची आकडेवारी समोर आली आहे.
शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत देण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी अपुरा असल्यास, ही मदत उणे बजेटमधून केली जाईल, अशी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. दूध देणाऱ्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास सुमारे 37,500 रुपये तर ओढकाम करणारी म्हणजेच मेहनतीची कामे करणारी जनावरे दगावल्यास 32 हजार रुपयांची मदत मिळू शकते. याशिवाय, घरांची पडझड झाल्यास झोपडीसाठी 8 हजार आणि पक्क्या घरासाठी मदत 12 हजार रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येथे वाचा – सोयाबीन भाव वाढणार; या कारणामुळे शेतकऱ्यांना भाव मिळण्याची शक्यता..!
कोणत्या पिकासाठी किती मदत?
शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा तक्ता जाहीर करण्यात आला आहे. मात्र या मदतीची रक्कम अपुरी असल्याने ती वाढवावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार शेतकऱ्यांना मिळणारी मदत अशी असेल. (1) जिरायत पिकासाठी प्रति हेक्टर 8,500 (ही मदत कमाल 2 हेक्टरपर्यंत असणार). (2) बागायत पिकासाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये (ही मदत कमाल 2 हेक्टरपर्यंत असेल). (3) फळबागा पिकासाठी प्रति हेक्टर 22,500 (ही मदत कमाल 2 हेक्टरपर्यंत असेल). (4) जमीन 3 इंचापेक्षा जास्त खरडून गेली असेल तर प्रति हेक्टर 47,000 रुपये इतकी मदत मिळेल. (5) शेतकऱ्यांच्या जमिनीवर दगड, मुरुम, वाळू साचल्यास त्यांना प्रति हेक्टर 18,000 मदत मिळणार
येथे वाचा – पाऊस अजून किती दिवस पडणार? पहा पंजाब डख काय म्हणतात..!
केंद्राकडे मदतीची मागणी
अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारनेही शेतकरी खरोखरच हवालदिल झाल्याचे मान्य केले असून, ठराविक निकष न पाहता मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र राज्यातील नुकसानीचा व्याप प्रचंड असल्याने आता राज्य सरकार केंद्र सरकारला मोठ्या आर्थिक मदतीसाठी मदत मागत आहे. त्यामुळे केंद्राकडून किती निधी मिळतो आणि राज्य सरकार नेमकी कशी मदत करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.